जळगाव : न्यायालयीन कोठडीत जाण्यापूर्वीच पोलिसांच्या हातावर तुरी देवून न्यायालयाच्या आवारातून पळ काढणाऱ्या सराईताच्या मुसक्या आवळत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबरी चोरीतील संशयित भोलासिंग जगदिशसिंग बावरी (वय ३२, रा. तांबापूर) हा बुधवारी न्यायालयातून पळून गेला होता. दिवसभर लपून राहिल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तो लपत छपत घराकडे जात असताना गुरुवारी पहाटेच्या सुमारास रात्रीच्या गस्तीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांनी भोलासिंग याच्या वाटेतच मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार दिवसांपूर्वी कारागृहातून बाहेर आलेल्या भोलासिंग बावरी याने भंगार विक्रेत्याला मारहाण करीत त्याच्याजवळील तीन हजारांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याप्रकरणी रेकॉर्डवरील संशयित भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय ३२, रा. तांबापुरा) याला शनिपेठ पोलिसांनी अटक केली होती. त्याला १३ जून रोजी न्यायाालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. परंतु, संशयिताची नंदुरबार येथील कारागृहात रवानगी करायची असल्याने संशयिताला घेवून आलेले पोलीस न्यायालयाकडून मिळणाऱ्या वारंटसाठी न्यायालयाच्या आवारात थांबले होते. तर गस्तीवर असलेला कर्मचारी संशयिताला घेवून जाण्यासाठी वाहन पाहण्यासाठी न्यायालयाच्या आवारातील पोलीस चौकीजवळ गेले. यावेळी भोलासिंग याने दुसरे कर्मचारी श्रीराम बोरसे यांना पिण्यासाठी पाणी मागितले. बोरसे हे पाण्याची बॉटल घेण्यासाठी मागे वळताच भोलासिंग बावरी याने त्यांच्या हाताला झटका देवून तो तेथून पसार झाला होता.