शेवगाव : अहमदनगरमधून एक अपघाताची घटना समोर आली आहे. रक्षाबंधनसाठी माहेरी आलेल्या बहिणीला सासरी सोडायला जाताना भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अक्षय मरकड असे अपघातात मृत्यू झालेल्या भावाचे नाव आहे. ही घटना शेवगाव तालुक्यातील घोटन येथे घडली आहे.
नेमकं काय घडलं?
अहमदनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील सोलनापूर येथे सासरी राहत असलेली बहिण अश्विनी महेश खराद ही रक्षाबंधन निमित्त आपल्या दोन भावांना राखी बांधण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे आली होती. आपल्या बहिणीला पुन्हा सासरी सोडण्यासाठी तिचा लहान भाऊ अक्षय विजय मरकड हा हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीच्या दुचाकीवरून निघाला होता.
यावेळी शेवगाव तालुक्यातील घोटन येथे समोरून मोटारसायकल वरून आलेल्या मद्यपी चालकाने समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात अक्षय याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अक्षयला उपचारासाठी शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराअगोदरच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातामुळे मरकड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.