पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. जुन्या संचालक मंडळांन घेतलेल्या कर्ज वसूल करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने करावी केली आहे. यामध्ये बँकेने साखरेचे गोडवूनसह इतर मालमत्ता ताब्यात घेतली आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीनचीट मिळाली असताना अभिजीत पाटलांवर कारवाई झाल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतून कारवाई झाल्याचा आराेप अभिजित पाटील यांनी केला आहे.
माढा लोकसभेसाठी करमाळा तालुक्यात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटीलही उपस्थित होते. दरम्यान, या सभेत असतानाच अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील साखर पोती साठा बँकेने जप्त केला. शिवाय जप्तीची कारवाई केल्यानंतर शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना सील केला आहे. शिखर बँकेचे पैसे न भरल्याने काही दिवसापूर्वी बँकेने कारवाई सुरू केली होती. यावर पाटील यांनी स्टे घेतला होता. आज स्टे उठताच बँकेच्या अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई केली.
अभिजीत पाटलांना रोहित पवारांनी दिली माहिती
अभिजित पाटील हे करमाळा येथे शरद पवार यांच्या सभेत उपस्थित होते. त्यांना कारखान्यावर कारवाई सुरु असल्याची कोणतीही माहिती नव्हती. यावेळी रोहित पवार यांनी भाषणात कारवाई सुरू झाली असल्याची माहिती दिली. यानंतर पाटील तातडीने पंढरपूरकडे रवाना झाले. अभिजित पाटील यांनी पंढरपूरमध्ये आज शरद पवार यांची संध्याकाळी सभा ठेवली आहे. शरद पवार आज पंढरपूरमध्ये मुक्कामाला असताना ही कारवाई मुक्कामाला एकच खळबल उडाली आहे.