अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दारू पिऊन शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) सकाळी नगर मनमाड रस्त्यावरील बोल्हेगाव फाटा येथे स्वराज ट्रॅक्टरच्या शोरूमशेजारी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १२ तासाच्या आत आरोपीला अटक केली आहे.
अश्विन मारूती कांबळे (वय ३६, रा. जत्राड, निपाणी, बेळगाव, सध्या रा. गणेशनगर, नागापूर, अहिल्यानगर) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर भास्कर विठ्ठल देशमुख (वय ३७, रा. वाळुंज, ता. जि. अहिल्यानगर) असं आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी कल्पना अश्विन कांबळे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विन कांबळे हा एमआयडीसीमधील एका कारखान्यात काम करत होता. शहरातील बोल्हेगाव फाटा परिसरातील स्वराज ट्रॅक्टर दालनाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका मोकळ्या जागेत शनिवारी (दि. ११) सकाळी दहाच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक संपत भोसले, एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी तत्काळ
घटनास्थळी धाव घेतली.
परिसरात विचारपूस करून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण करून तत्काळ तपास सुरू केला असता हा खून भास्कर देशमुख याने केला असून, सध्या तो वेलतुरी (ता. आष्टी, जि. बीड) येथे असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने वेलतुरी येथे जावून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता अश्विन कांबळे याने दारू पिवून शिवीगाळ केल्याच्या रागातून त्याच्या डोक्यात दगड घातला, अशी कबुली आरोपी देशमुख याने दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.