संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्वारीच्या शेतात शौचासाठी गेलेल्या एका महिलेवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. हा प्रकार संगमनेर तालुक्यातील एका वाडीत घडला आहे. याप्रकरणी सासूने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नामदेव मच्छिंद्र चव्हाण असे अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील विवाहित महिला बुधवारी दुपारी घरामागील ज्वारीच्या शेतात शौचासाठी गेली होती. महिला एकटीच शेतात गेल्याचे पाहून नामदेव मच्छिंद्र चव्हाण याने शेतात जाऊन या महिलेवर दोनदा अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. घरी आल्यावर पिडित महिलेने घडलेला प्रकार सासुला सांगितला.
शुक्रवारी रात्री उशिरा सासूने याप्रकरणी शहर पोलिसात फिर्याद दिली. नामदेव चव्हाण याच्याविरोधात महिलेवर अत्याचारासह धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भान्सी करीत आहेत.