नाशिक : नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावर धावत्या एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या बसमधून जवळपास ४० प्रवासी प्रवास करत होते. बसला आग लागल्याचे समजताच बसमधील प्रवासी खाली उतरले. सर्व प्रवासी बसमधून खाली उतरल्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावरून ही बस निघाली होती. खिरमणी फाट्यावर बस रस्त्यात थांबल्यानंतर या बसला अचानक आग लागली. एसटी महामंडळाच्या सटाणा-प्रतापूर या बसने पेट घेतला. या एसटी बसमधून ४० प्रवासी प्रवास करत होते.
बसने अचानक पेट घेतल्यानंतर प्रवासी तातडीने गाडीतून खाली उतरले. बसला आग लागल्यानंतर एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे बसमधील प्रवासी बचावले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येईपर्यंत बस पूर्णत: जळून खाक झाली होती. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.