अहमदनगर : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांचे समर्थक वसंत देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अहमदनगरसह संगमनेरच्या धांदरफळमध्ये उद्रेक झाला आहे. बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस समर्थकांनी सभा उधळली. तर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. वाहनांची तोडफोड तसंच ती जाळण्यात आली. तसेच वसंत देशमुखांसह सुजय विखे- पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील आणि भाजपचा निषेध केला जात आहे.
याबाबत आता सुजय विखे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला जीवे मारण्याचा कट होता’,असा खळबळजनक दावा सुजय विखे यांनी केला आहे. मी त्यांना ताई म्हणून संबोधलं, त्यामुळे महिलांचा सन्मान व्हायलाच हवा असं सुजय विखेंनी म्हटलं आहे. मात्र, ज्यांनी आमच्या गाड्या जाळल्या त्यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी देखील सुजय विखे यांनी केली आहे.
काय म्हणाले सुजय विखे?
सुजय विखे म्हणाले, वसंत देशमुख हे त्या भागातील असल्याने त्यांना बोलावलं होतं.वसंतराव देशमुख महायुतीचे घटक नाहीत. केवळ त्या गावातील विरोधक म्हणून स्टेजवर आले होते. त्यांना भाषणाला कोणीही उठवलं नव्हतं ते स्वतःहून भाषणाला उठले. भाषण करताना मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते थांबले नाहीत. अशा प्रकारच्या खालच्या पातळीची टीका महायुती स्वीकार करत नाही. गुन्हा दाखल झाला असेल तर कारवाई करा असं देखील आम्ही पोलिसांना सांगितलं. मात्र, वक्तव्य केलं तो बाजूला राहिला, मात्र नंतर गाड्यांची तोडफोड, जाळपोळ केली. हा मला मारण्याचा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप सुजय विखे यांनी केला आहे.
संगमनेरचं खरं चित्र आज महाराष्ट्रासमोर आले
पुढे म्हणाले, रस्ता बदलला म्हणून मी वाचलो. मी सभेतून निघताना त्यांच्याच यंत्रणेतून मला एकाचा फोन आला, हे असं असं करणार आहेत. तुम्ही या रस्त्याने येऊ नका दुसऱ्या रस्त्याने जा असं त्याने मला सांगितलं. मात्र, मी जाण्याआधी ज्या गाड्या निघाल्या होत्या. त्या यातून वाचू शकल्या नाहीत. माझ्यावरचा हल्ला माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर घेतला. वक्तव्य करणाऱ्याला अटक करा माझं काही म्हणणं नाही. मात्र, सर्वसामान्य घरातील महिलांना रात्री गाडीतून बाहेर ओढून हल्ला करता हे संगमनेरचं खरं चित्र आज महाराष्ट्रासमोर आले आहे.
आमच्या कोणत्या कोणत्या कार्यकर्त्यांवर काय गुन्हे दाखल झाले याचा आढावा अद्याप मी घेतला नाही. माझा कार्यकर्ता सुखरूप पोहोचला की नाही हे माझ्यासाठी काल महत्त्वाचं होतं. हे काही कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन देखील मारहाण करणार होते. ही खबर मला मिळाल्याने त्या कार्यकर्त्यांना घरी थांबू नका असा सल्ला दिला, असं सुजय विखे म्हणाले.