नाशिक : नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंगमध्ये 8 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरातून उचलून नेत तिचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना १५ मे रोजी उघडकीस आली आहे. भविका उर्फ रिया ज्ञानेश्वर महाले (वय-8) खून करून मृतदेह विहिरीत टाकलेल्या चिमुकलीच नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडल?
मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील भविका ही अजंग येथील प्रशांत नगरमध्ये राहणारी तिची आजी निर्मला शेलार यांच्याकडे शिक्षणासाठी आली होती. सोमवारी (दि. 13) रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भाविकाची आजी तिला झोपवून गल्लीतच होत असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेली होती.
मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास निर्मलाबाई घरी आल्या असता त्यांना भाविका घरी दिसली नाही. त्यामुळे त्यांच्यासह ग्रामस्थांनी आजूबाजूला शोधाशोध केली. भाविका न सापडल्याने नातेवाईकांनी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. भाविकाचा शोध सुरू असतानाच बुधवारी गावातीलच विनोद शिजळे यांच्या मोसम नदीकिनारी असलेल्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
पोलिसांनी संशयितांना त्वरीत अटक करावी. दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी अजंग येथे स्वयंस्फुर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला. अजंग-वडेल ग्रामस्थांनी सलग दुसऱ्या दिवशी गुुरुवारी (ता. १६) मालेगाव-नामपूर रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. तसेच दोषींना अटक होत नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली. पोलिसांनी सात दिवसात या गुन्ह्याचा छडा लावू. संशयितांना गजाआड करु असे आश्वासन दिल्यानंतर तब्बल पाच तासानंतर ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले.
पुन्हा आज सकाळी शेकडो स्त्री-पुरुषांनी मालेगाव-नामपूर रस्त्यावर तंबू ठोकून रास्तारोको आंदोलनाला सुरुवात केली. काटेरी झुडूपे व विटा टाकून तसेच दुचाकी आडव्या लावत ग्रामस्थांनी रस्ता बंद केला होता. अजंग येथे झालेल्या रास्तारोको आंदोलनात ग्रामस्थ संतप्त झाले होते. कारवाई न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा, कुठल्याही राजकीय पक्षाचा बुथ लावू न देण्याचा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून या गुन्ह्याचा सात दिवसात छडा लावू असे आश्वासन भारती यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलन संपताच ग्रामस्थ व नातेवाईकांनी भाविकाचा मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली.