चोपडा (जळगाव) : जळगाव जिह्याच्या चोपडा तालुक्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका गावात बारावर्षीय मुलीस जबरदस्तीने शेतात ओढत नेत अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीसोबत असलेल्या तिच्या लहान बहिणीने गावात येऊन आरडाओरड केल्यानंतर ही घटना समोर आली आहे. या घटनेने जळगाव जिल्हा हादरून गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील विरवाडे परिसरात दोघी बहिणी शेतात कामाला गेल्या होत्या. सायंकाळी शेतातील काम आटोपून दोघी घरी येण्यासाठी निघाल्या असताना रस्त्यावर बारा वर्षीय चिमुरडीला २५ वर्षीय संशयिताने विरवाडे शिवारातील शेतात ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे खुनानंतर संशयिताने विवस्त्र अल्पवयीन मुलीला घटनास्थळावरून शंभर फूट ओढत नेत दुसऱ्या शेतात नेले.
या घटनेबाबत मृत मुलीच्या बहिणेने घडलेल्या प्रकाराबाबत गावात सांगितले. यानंतर घटना उघड झाली. घटनेची माहिती मिळताच चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टेसह शहर पोलिस घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. जळगावहून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर विरवाडे -आडगाव रस्त्यावर संशयिताला अटक करण्यात आली.