नाशिक : धुळ्याकडून मुंबईकडे लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला भरधाव टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात लोखंडी सळई शरीरात शिरुन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर सहा जण गंभीर जखमी झाले होते. नाशिकमधील द्वारका चौकातील उड्डाणपुलावर रविवारी (दि. १२) रात्री साडे सातच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती.
यानंतर अपघातातील जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता अपघातातील जखमींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले की, नाशिक-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल आणि जखमींचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.