नाशिक : ८५ पेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांना घरूनच मतदानाची संधी देण्यात आली असून त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येते आहे. ३५ हजार मतदारांना त्याचा फायदा होणार असून, त्याअंतर्गत दोन दिवसांत ३७५० मतदारांनी घरातूनच मतदानाचा हक्क बजावला. आठवडाभरात उर्वरित मतदान पूर्ण करण्यासाठी यंत्रणा सरसावली असून, त्याद्वारे जास्तीत जास्त मतदान कसे होईल, यासाठी यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोग आग्रही आहे. कुणीही मतदार कोणत्याही कारणाने मतदानापासून वंचित राहू नये, याची काळजी आयोगाकडून घेण्यात येते आहे.
याच पार्श्वभूमीवर यंदा ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींसह ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना घरबसल्या पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय सरकारी कर्मचारी आणि कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट मतदानाची व्यवस्था करून देण्यात आली आहे.
झालेले पोस्टल मतदान-
मालेगाव मध्य-६९, मालेगाव बाह्य-९६, बागलाण-१६७, नांदगाव-१२३, कळवण सुरगाणा- ११३, चांदवड देवळा-१०२, येवला-११८, निफाड-११४, दिंडोरी-२०५, सिन्नर-४२५, नाशिक पूर्व-१६३, नाशिक मध्य-८४, नाशिक पश्चिम-०, देवळाली-९५, इगतपुरी-त्र्यंबक-१०४