अहमदनगर : अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्षीय चिमुरड्यावर नरभक्षक बिबट्याने हल्ला करून घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेले. यात चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना राहाता तालुक्यातील चितळी गावात घडली आहे. प्रथमेश मयूर वाघ असं बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तीन वर्षीय मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमक काय घडलं?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहाता तालुक्यातील चितळी येथील मयूर दत्तात्रय वाघ याची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी रोड काकडाई मंदिराजवळ आहे. त्यांच्या घराजवळच डाळींबाची बाग मोठी आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंगणात खेळत असलेला प्रथमेश या चिमुरड्यावर घराशेजारी असलेल्या डाळींबाच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप टाकून धूम ठोकली.
बाहेर असलेल्या आजीने आरडाओरडा केल्याने घरातील सर्व व्यक्तींनी बिबट्याच्या दिशेने पळाले. मात्र, बिबट्या आढळून आला नाही, त्यांनी डाळींब, मका पिकात व इतर शोध घेतल्यानंतर घरापासून सहाशे फूट असलेली गिनीं गवतात रक्तबंबाळ अवस्थेत प्रथमेश हा चिमुरडा मिळून आला. त्याच्या मानेला मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या होत्या. तत्काळ त्याला पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून प्रथमेशला मृत घोषित केले.