मोहोळ : एका युवकाचा खोटा विवाह लावून त्याची सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन ३ लाख २१ हजाराची फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या टोळीचा मोहोळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पाच महिलांसह एका पुरुषाविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील ४ महिलांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालया पुढे हजर केले असता गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देगाव (ता. मोहोळ) येथील नितीन विष्णू भोसले (वय-२५) हे मुंबई येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. वडील शेती तर भाऊ विद्युत महावितरणमध्ये नोकरी करतो. दरम्यान नितीन याचा थोरला भाऊ सचिन (वय-३०) याच्या विवाहासाठी मुलगी शोधण्याचे काम सुरू होते.
नितीनच्या मावस भावाने विवाह जुळविणारा एजंट गंगाधर लाडबा ढेरे (रा. कोळेगाव बुद्रुक, ता भोकर, नांदेड) याचा नंबर दिला. त्या नंबरवर नितीनने संपर्क साधला असता मुलगी आहे, मात्र, लग्न जमलं तर रोख रक्कम अडीच लाख आणि गाडी भाड्यासाठी ११ हजार रुपये रोख असे एकूण २ लाख ६१ हजार रुपये द्यावे लागतील अशी अट घातली. त्यानंतर मुलीकडच्या मंडळींनी व्हाट्सअप वर मुलीचे फोटो पाठविले. घरातील सर्वांना मुलगी पसंत पडल्यावर नितीन भोसले कुटुंबीय रक्कम देण्यास तयार झाले.
दरम्यान, २ एप्रिल रोजी मुलीसह सहा जण दुपारी दोन वाजता चार चाकी गाडीतून देगाव येथे आले. ठरल्या प्रमाणे रोख रक्कम देण्याचे व त्याच दिवशी विवाह करण्याचे ठरले. त्या प्रमाणे नितीनच्या फोन पे वरून वेगवेगळ्या रकमेसह पाच वेळा १ लाख ३० हजार रुपये पाठवले. सचिनही चार वेळा वेगवेगळी रक्कम पाठवली. एकूण २ लाख ४१ हजार रुपये मुलीच्या नातेवाईकांना पोहोचले. त्याच दिवशी २ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भोसले कुटुंबियाच्या घरी घरगुती पद्धतीने विवाह सोहळा पार पडला.
दरम्यान मुलीच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असल्याने मुलीला माहेरी बोलावले. त्या प्रमाणे वडील व मुलगी १३ एप्रिल रोजी रात्री बसने गेले, ते १४ एप्रिल ला सकाळी साडेसात वाजता नागपूर हायवे वर उतरले. त्यावेळी शैलेशने रिक्षा करून मुलगी व विष्णू भोसले यांना अकोला बस स्थानकावर नेले. विवाहित मुलीगी लघुशंकेचे निमित्त करून गेली ती परतलीच नाही. तर शैलेशने आपल्याला घरी जाण्यासाठी गाडी येणार आहे, ती आली का? बघून येतो असं म्हणून गेला. तो ही गायब झाला.
बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर विष्णु भोसले यांना दोघेही मिळून आले नाहीत. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे विष्णू भोसले यांच्या लक्षात आले. घरातून जाताना मुलीने अंगावर सोन्याचे दागिने, फुले, झुबे, मंगळसूत्र चांदीचे पैंजण व जोडवी असा एकूण ५३ हजाराचा ऐवज व घरातील रोख २७ हजार रुपये घेऊन गेली.
नितीन भोसले व कुटुंबीयांना समजले की, आपली फसवणूक केलेल्या महिला पेनुर ता. मोहोळ येथील एका मंगल कार्यालयात कोंडी ता. उत्तर सोलापुर येथील प्रथमेश भोसले यांचा फसवून विवाह करण्यासाठी येणार आहेत. त्या माहितीच्या आधारे भोसले कुटुंब पेनुर येथील मंगल कार्यालयात गेले. त्या ठिकाणी फसवणूक केलेल्या महिला त्यांना आढळून आल्या.
नितीन भोसले कुटुंबीयांनी तातडीने मोहोळ पोलीस ठाण्याची संपर्क साधून हा प्रकार सांगितला. दरम्यान, पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत आदलिंगे व अन्य पोलीस पथक सोबत भोसले कुटुंबीय पेनुरला मंगल कार्यालयात आले. नवीन होणारी नवरी व अन्य तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी खोटा विवाह, लावून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३ लाख २१ हजाराची फसवणूक केल्या प्रकरणी नितीन भोसले रा देगाव यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणातील ४ महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तर दोघे जण फरार आहेत. या घटनेचा तपास हवालदार चंद्रकांत आदलिंगे करीत आहेत.