नंदूरबार : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कारवाईला 24 तासही उलटत नाही, तोच शनिवारी शिरपूरजवळच्या नंदुरबारमध्ये (nandurbar news) आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. शहादा तालुक्यातील नवागावातील माजी झेडपी सदस्याने केळीच्या पिकात गांजाची लागवड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून 18 लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील नवागाव येथील केळीच्या शेतात बेकायदेशीर गांजाची शेती आढळून आली आहे. जिल्हा परिषदच्या माजी सदस्याने केळीच्या बागेत गांजाची लागवड केली असल्याचं पोलिसांना समजले. यानंतर शहादा पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबारच्या पथकाने अचानक धाड टाकली. त्यामध्ये 253 किलो 18 ग्रॅम वजनाचे गांजा मिळून आला आहे. बाजारभावाप्रमाणे या गांजाची किंमत 17 लाख 74 हजार 662 रुपये एवढी आहे. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.