सोलापूर : सोलापुरात एका वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षकाला विद्यार्थ्यानेच लाखो रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षकाशी असलेल्या ओळखीतून विद्यार्थ्याने आर्थिक गुंतवणुकीच्या नावाखाली आकर्षक परताव्याची आमिष दाखवून तब्बल १२ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत सलीम शमशोद्दीन वळसंगकर (वय-६८, रा. रमाकांत कर्णिकनगर, सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून त्यांचाच विद्यार्थी असलेला सोहेल हजरतखान पटेल (रा. कांदाबाजार, अक्कलकोट) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पटेल गायब झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सलीम वळसंगकर हे पूर्वी पंढरपूर नगरपरिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्याच शाळेत सोहेल पटेल हा विद्यार्थी म्हणून वळसंगकर यांच्याकडून अध्यापनाचे धडे घेत होता. तेव्हापासून त्याची वळसंगरकर यांच्याशी ओळख होती. दरम्यान, २१ ऑगस्ट २०२३ रोजी त्याने सोलापुरात वळसंगकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
ॲमेझाॅन इंटरनॅशनल कंपनी आणि भारत पे नॅशनल कंपनीमध्ये गुंतवणूकदार म्हणून मी काम करत असल्याचे सांगितले. तसेच कंपनीने दिलेले स्वतःचे ओळखपत्र दाखवून गुरूजींना गुंतवणुकीची योजना सांगून अडीच लाखांची रक्कम कंपनीत गुंतवण्यास सांगितले. गुंतवलेल्या रक्कमेचे एका वर्षात ३ लाख ६५ हजार बँक खात्यावर जमा होतील, असे म्हणून विश्वास संपादन केला.
सोहेल पटेल याने सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी मिळून वळसंगकर यांनी १२ लाख ५० हजार रूपयांची रक्कम गुंतवली. मात्र, वर्ष उलटून गेले तरी परतावा मिळत नसल्यामुळे वृध्द वळसंगकर यांनी पटेल याच्या मागे लगादा लावला. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि शेवटी त्याने, मला रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे. तुम्ही मला पैसे परत मागितले तर मी तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.