शिर्डी : शिर्डीत जगभरातून भाविक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्याच साईबाबांच्या शिर्डीत गुन्हेगारांनी तलवारी फिरवत राडा घातला आहे. सोमवारी १९ फेब्रुवारीला शिर्डीत तिघांनी एका तरुणावर तलवार तसेच चॉपरने वार केले आहे. हा प्रकार साईमंदिराच्या ४ नंबर प्रवेशद्वारासमोरील भर बाजारात घडला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सूर्यकांत शशिकांत वाणी (वय २४) असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी निखिल महादेव सोनवणे, आर्यन राजकुमार पाटील, प्रदीप सुनील सोनवणे याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सोमवारी सायंकाळच्या सुमारास सूर्यकांत हा साईमंदिराच्या चार नंबर प्रवेशद्वारासमोरील बाजारपेठेत उभा होता. त्यावेळी तीन आरोपी तिथे आले. त्यांनी वाद घालत सूर्यकांतवर तलवार तसेच चॉपरने हल्ला चढवला. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. हातात तलवार घेऊन बाजार पेठेत राडा घालणाऱ्या टोळक्याचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे.