पुणे: तुमच्याकडे फास्टॅग असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नवा नियम बनवला आहे. या नव्या नियमानुसार, जे वाहनचालक वाहनाच्या समोरच्या विंडशील्डला फास्टॅग जोडत नाहीत त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.
वारंवार सूचना देऊनही काही लोक अजूनही करच्या विंडस्क्रीनवर जाणूनबुजून फास्टॅग चिकटवत नाहीत ज्यांच्या विरुद्ध आता कठोर कारवाई करण्यासाठी NHAI ने नवीन नियम लागू केला आहे. एनएचएआयचे म्हणणे आहे की, फास्टॅग योग्य प्रकारे न लावल्याने टोल बूथवर ट्रॅफिक जाम होते. त्यामुळे, इतर वाहनचालकांनाही विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो.
या नव्या नियमांनुसार, प्रमाणभूत कार्यपद्धतीही (SOP) तयार करण्यात आली आहे. ही प्रमाणभूत कार्यपद्धती सर्व टोल वसुली करणाऱ्या एजन्सींना सोपवण्यात आली आहे. याच प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार, जर गाडीच्या समोरच्या विंडशील्डच्या आतील बाजूस फास्टॅग लावलेले नसेल तर अशा वाहनांना टोलचे शुल्क दुप्पट भरावे लागणार आहे.
गुरुवारी NHAI ने एक निवेदन जारी केले आणि म्हटले की, जर एखाद्या व्यक्तीने करच्या विंडस्क्रीनवर फास्टॅग लावला नाही, तर त्याच्याकडून दुप्पट टोल वसूल करण्यासाठी सर्व वापरकर्ता शुल्क संकलन संस्थांना तपशीलवार SOP जारी करण्यात आल्या आहेत. कारच्या समोरील विंडस्क्रीनवर निश्चित फास्टॅग शिवाय टोल लेनमध्ये प्रवेश केल्याबद्दल लोकांना दंडाची माहिती देण्यासाठी ही माहिती सर्व टोल प्लाझावर प्रदर्शित केली जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
ज्या वाहनांवर फास्टॅग नसेल अशा वाहनांचे वाहन नोंदणी क्रमांक (VRN) रेकॉर्ड करण्यासाठी टोल प्लाझाकडून CCTV चा वापर योग्य प्रकारे करण्यात येणार आहे. या CCTV फुटेजमुळे आकारण्यात येणाऱ्या टोलच्या अचूक नोंदी ठेवण्यासही मदत होईल. या पार्श्वभूमीवर, ‘एनएचएआय’ने सध्याच्या नियमांनुसार फास्टॅग समोरच्या विंडशील्डच्या आतील बाजूस असणे आवश्यक असल्याची आठवण सर्वांनाच करून दिली आहे. तसेच या नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनांना दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे.