मुंबई : न्यूज चॅनल्सवरून हिंसक घटनांचे वार्तांकन करताना दर्जा आणि सभ्यतेला हानी पोहोचेल अशा पद्धतीने वार्तांकन करु नये. असे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोमवारी (दि. ९) रोजी आदेश दिले आहेत. त्यामुळे आता हिंसक घटनांचे वार्तांकन करताना खबरदारी घ्यावी लागणार आहे.
न्यूज चॅनल्सनी अपघाताच्या घटना, मृत्यू आणि महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या संदर्भातील हिंसक घटनांचे वार्तांकन करताना काळजी घ्यावी. अशा घटनांच्या संदर्भात न्यूज चैनल्सनी विवेकबुद्धी न दाखवता वार्तांकन केल्याच्या अनेक घटना मंत्रालयाच्या निदर्शनास आल्यानंतर या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
या आदेशात मंत्रालयाने म्हटले आहे की, अनेक न्यूज चॅनल्सवाले मृतदेहांच्या खुनाच्या बातम्या दाखविताना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी व्यक्तीच्या प्रतिमा प्रसारित करत आहेत. समाजातील महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना मारहाण करतानाची जवळून चित्रित केलेली दृश्ये, तसेच शिक्षकांकडून मारहाण करण्यात येणाऱ्या मुलांचे रडणे अशा दृश्यांचे अनेक व्हिडिओ सतत काही मिनीटे प्रसारण करण्यात येते.
तसेच संबंधीत हे चित्र ब्लर करण्याची किंवा लांबून दाखवण्याची खबरदारी देखील वार्तांकन करताना घेतली जात नाही. अशा प्रकारचे वार्तांकन प्रेक्षकांसाठी त्रासदायक असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
न्यूज चॅनल्सवरून अशा प्रकारच्या वार्तांकनाचे प्रेक्षकांवर होणारे दुष्परिणाम ठळकपणे नोंदवण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या बातम्यांचा लहान मुलांवर विपरीत मानसिक परिणाम होऊ शकतो. असे देखील मंत्रालयाने म्हटले आहे. अशा प्रकारच्या बातम्यांमुळे पीडितांच्या प्रतिमा मलीन, बदनामी या शक्यतेसह व्यक्तीच्या गोपनीयतेवर अतिक्रमण यासारखा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
न्यूज चॅनेल्सवरून बातम्यांचे प्रसारण करताना एक जबाबदारीची भावना तसेच शिस्त असायला हवी. आणि ही बाब कार्यक्रम संहिता आणि जाहिरातविषयक संहिता यामध्ये आवर्जून नमूद करण्यात आली आहे. असे केंद्र सरकारने आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, मंत्रालयाने काही वृत्तांकनाची उदाहरणे देत वार्तांकनातील दृश्ये बहुतेकदा समाज माध्यमांतून उचलून कोणताही संपादकीय विवेक न बाळगता आणि कार्यक्रम संहितेतील नियमांचे पालन न करता प्रसारित केल्याची नोंद घेतली आहे. अशा प्रकारच्या नुकत्याच प्रसारित करण्यात आलेल्या काही वृत्तांची यादी देखील दिली आहे. तसेच न्यूज चॅनल्सनी मृत्यू, गुन्हेगारी, अपघात आणि हिंसाचाराच्या घटनांचे वृत्तांकन करताना ठरवून दिलेली आचारसंहिता पाळण्याचा सल्ला दिला आहे.