बारामती : माझ्यावर बारामतीने गेली 33 वर्षे प्रेम केलं आहे. बारामतीकरांच्या जोरावर मी राज्यभर सक्षमपणे फिरु शकलो. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासाच्या मागे उभे राहायचं की नाही. याबाबतचा निर्णय तुम्ही आणि तुमच्या परिवाराने घ्यायचा आहे. या ही विधानसभा निवडणुकीला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे रहाल, याबाबत कोणतीही शंका नाही. मात्र काहीजण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. येणा-या पुढील काळात बारामतीचा विकास कोण करेल याची जाणीव तुम्हाला आहेच, तर तुम्ही योग्य विचार कराल. तुमच्याकडे कोणी आले तर ते सांगतील ते ऐकून घ्या. पण बटन दाबताना घड्याळाचच दाबा, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सोमवारी व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बारामतीतील जिजाऊ भवन येथे हा मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मी जात-धर्म बघत नाही, बारामतीकरांचा फायदा बघतो. भिगवण रोड रूंद झाला,सुशोभिकरण होतयं. हे सर्व स्पॉट निवडणूकी अगोदर पूर्णत्वाला न्यायचे होते. पुढील 50 वर्षे डोळ्यासमोर ठेऊन विचार करावा लागतो, असेही अजित पवारांनी बोलताना सांगितले. लाडकी बहीण योजना राज्यभर पॉप्युलर झाली. काहीजण म्हणाले लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत काढून घ्या, नाहीतर परत जातील…इथपर्यंत माझी चेष्टा मस्करी केली, अशी टीका अजित पवारांनी केली.
पूर्वी पवारांकडून जेवणं मिळत नव्हते. काहीच मिळत नव्हतं. तर पवार हे भेटायलासुद्धा येत नव्हते. कुठे काय झालं तर मी कधीतरी भेटायचो. आता शहरात लोक फिरायला लागली आहेत, तसेच घमेली वाटायला लागली. महिलांना साड्या वाटायला लागली. असं सगळं सुरु आहे. त्या निमित्ताने पवार घरी यायला लागले हे बरं झालं ना…आता नावं माहित नसलं तरी मी ओळखते तुम्हाला……ओळखते… तुम्हाला. कधी नव्हे तो अजित पवारही हसायला लागलाय. मिळतयं ते घ्या, सोडू नका पण घड्याळाला मतदान करा…तुमच्या मनात जो उमेदवार आहे तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील, असं मोठं विधानही अजित पवारांनी केलं.
मी बारामतीचे नेतृत्व करत आहे, तोपर्यंत कोणाचीही दादागिरी इथे चालू देणार नाही. माझ्या जवळचा एखादा कार्यकर्ता चुकत असला तरी त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहगे. आमचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला पाठीशी घातले जाणार नाही. मध्ये काहींचं माझ्या कानावर आलं. मी तात्काळ पोलिसांना सांगितलं उचला त्यांना आणि त्यांची तुरुंगात रवानगी करा. आता त्यांना मोका लागला आहे. त्यामुळे बारामतीत कोणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असेही पुढे बोलताना अजित पवार म्हणाले.