Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील नवाब मलिकांच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं नवाब मलिकांना वैद्यकीय कारणांसाठी तात्पुरता जामीन दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की, उच्च न्यायालय निकाल देईपर्यंत नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन कायम राहणार आहे. न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्यासमोर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर ते तुरुंगात होते. नवाब मलिक सध्या जामिनावर बाहेर आहेत. ते मुंबई चेंबूर येथील अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
यावेळी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जोपर्यंत नवाब मलिक हे आजारी आहेत, तोपर्यंत ते बाहेर राहू शकतील. त्यांना तोपर्यंत तुरुगांत ठेवता येणार नाही. याशिवाय, ते आजारी असेपर्यंत जामीनावर राहू शकतात, असे कोर्टाने स्पष्ट केलं आहे. तसेच सक्तवसुली संचालनालयाने देखील याला कसलाही विरोध केला आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे.