शारदीय नवरात्री आणि विजयादशमी झाल्यानंतर सर्वांच्या नजरा वळतात त्या म्हणजे कोजागिरी पौर्णिमेकडे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमा असे म्हणतात. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते. कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ असतो, त्यामुळे आपल्याला चंद्र आकाराने मोठा दिसतो. यंदा कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर 2024 रोजी साजरी केली जाणार आहे.
यंदा कोजागिरी पौर्णिमा कधी?
पंचांगानुसार, या वर्षी अश्विन महिन्याची पौर्णिमा 16 ऑक्टोबरला, म्हणजेच बुधवारी रात्री 8.40 वाजता सुरु होणार असून ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4.56 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यानुसार, 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे.
उकळलेलं दूध पिणं महत्त्वाचं का?
असं म्हणतात की, शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरणं ही अमृतसारखी असतात, म्हणून या दिवशी लोक खीर किंवा दूध तयार करतात आणि रात्री ते चंद्रप्रकाशात ठेवत असतात. असं केल्याने चंद्राची किरणं त्या दुधावर किंवा खिरीवर पडतात आणि त्यावर अमृताचा प्रभाव होतो, असं मानलं जातं. कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा खीर प्रसाद म्हणून दिली जाते.
पूजेसाठी लागणारे साहित्य..
कोजागिरी पौर्णिमेसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये कलश, तेल, 5 प्रकारची फळं, फूल, 11 दिवे, तूप, पानं, धूप, सुपारी, चंदन, अक्षतासह अन्य साहित्य एकत्र करा.
कोजागिरी पौर्णिमेची पूजा पद्धती नेमकी कशी?
अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करा. मंदिराचा देव्हारा नीट स्वच्छ करा. त्यानंतर लाल कपडा पसरवून त्यावर देवी लक्ष्मीचा फोटो लावा. त्यानंतर देवीची पूजा सुरु करा. चंद्रोदयानंतर तुपाचा दिवा लावा.