Nashik News : नाशिक : नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर भीषण अपघात झाला आहे. देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची ही बस थेट दरीत कोसळली. या अपघातात एकजण ठार झाला असून, २२ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे, तर काही प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुलढाण्यातील खामगाव येथे जात होती बस
बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही भीषण बस अपघात झाल्याचे समोर आले आहे. सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला हा अपघात झाला. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळली. आज पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. (Nashik News) सप्तश्रृंगी गडावरुन बुलढाण्यातील खामगाव येथे जात असताना बस दरीत कोसळली. खामगाव डेपोची एसटी बस अपघातग्रस्त झाली. यावेळी बसमध्ये २२ जण प्रवास करत होते. १६ प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील मुडी या गावचे असून, गडावरील ४ प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. इतर दोघांमध्ये बसचालक व वाहकाचा समावेश आहे. या सर्व जखमींना नांदुरी आणि वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त बस क्रमांक (MH 40 AQ 6259) रात्री सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी होती. पहाटेच्या सुमारास बस गडावरुन खाली यायला निघाली. दाट धुक्याचा परिसर, सातत्याने पडणारा पाऊस आणि घाटात असलेल्या अवघड वळणांवर चालकाचा ताबा सुटून बसचा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Nashik News) बसमध्ये चालक गजानन टपके, वाहक पुरुषोत्तम टिकार कर्तव्यावर होते. अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे, असे खामगाव आगार सहाय्यक कर्मचारी शुभांगी पवार यांनी सांगितले.
अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. (Nashik News) पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. ही बस खामगाव डेपोची असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे मालेगावहून अपघात स्थळाच्या दिशेने रवाना झाले असून, तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. बचावपथक, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून, जखमी प्रवाशांना वणी उपरुग्णालयात नेले जात आहे.
अपघातग्रस्तांची गैरसोय होणार नाही, यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून, मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आई सप्तश्रृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना, अशी प्रतिक्रीया पालकमंत्री भुसे यांनी व्यक्त केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nashik News : अजित पवार गटाकडून नाशिकमधील राष्ट्रवादी कार्यालयाचा ताबा; वातावरण तापले
Nashik News : हृदयद्रावक! आई-वडील पंढरपूरच्या वारीत असताना लेकराचा अपघातात मृत्यू, नाशिक हळहळले