धुळे : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून प्रचाराने जोर पकडला आहे. धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धुळ्यात जाहीर सभा होत आहे. यावेळी मोदींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली. आचारसंहिता संपून जसे महायुतीचे सरकार स्थापन होईल, तसे मी वाढवण बंदरासह विमानतळाबाबत देवेंद्र फडणवीस यांची इच्छा कशी पूर्ण होते, त्यावर एकत्र बसून निर्णय घेऊ, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी ऑगस्ट महिन्यात पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींना फडणवीसांनी एक इच्छा व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की, ‘देशातील सगळ्यात मोठं बंदर उभं राहात असेल आणि मोदीजी इतकं सगळं करत आहात, हजारो कोटी खर्च करत आहात तर तिथे एक एअरपोर्ट उभे करा, अशी इच्छा फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्या दिवशी तर मी शांत राहिलो होतो. परंतु राज्यातील आचारसंहिता जेव्हा संपेल आणि महाराष्ट्रात महायुतीचा शपथविधी होईल. तेव्हा मी महाराष्ट्र सरकारसोबत बसून देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण करेल असं बोलतना मोदी म्हणाले.
यावेळी पंतप्रधान मोदींनी सभेत महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. देशभरात माझी लाडकी बहीण योजनेचे कौतुक होत आहे. तर इकडे महाविकास आघाडी ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेली. जनतेला लुटण्याचे काम आघाडी सरकारने केले. अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार केला. अडीच वर्ष आघाडी सरकारने जनतेची लूट केल्याची टीकाही यावेळी पंतप्रधान मोदींनी केली आहे.