Nagpur News : नागपूर : व्याघ्रसंवर्धसाठी आटोकाट प्रयत्न होत असतानाच महाराष्ट्रात २०१८ ते २०२२ या पाच वर्षांत तब्बल ११५ वाघांचा विविध कारणाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात २४ वाघांचा मृत्यू शिकारीमुळे झाला आहे. तर शेतात लावण्यात येणाऱ्या विजेच्या प्रवाहामुळे नागपुरात दहा वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिकार रोखण्यासाठी वन विभागाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न अपयशी झाल्याचे स्पष्ट होत आहे. माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती समोर आली आहे.
माहिती अधिकारांतर्गत माहिती आली समोर
वाघांच्या संवर्धनासाठी वन विभागाकडून अनेक प्रकारचे उपक्रम राबवण्यात येत आहे. वनविभागाच्या प्रयत्नामुळे वाघांच्या संख्येत वाढ देखील झाली आहे. मात्र एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना वाघांचे मृत्यू देखील होत आहेत. आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागितलेल्या माहितीत वन विभागाने हे आकडे दिले आहेत. (Nagpur News) २०१८ ते २०२२ मध्ये वाघांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणाने झाला. नैसर्गिक मृत्यू ६७, शिकार २४, अपघात १४, विद्युत प्रवाहामुळे १० मृत्यू झाले आहेत.
नागपुरात दहा वाघांचा मृत्यू शेतात लावलेल्या विजेच्या प्रवाहामुळे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होत असल्यामुळे जंगलाशेजारील गावातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. (Nagpur News) वनविभागाने प्राणी गावात शिरू नये, म्हणून फेंसिंग टाकणे अपेक्षित आहे. पण, अद्याप बऱ्याच ठिकाणचे प्रस्ताव धुळखात पडले आहेत. त्यामुळे पिकांच्या नुकसानीला त्रासून काही शेतकरी विजेच्या प्रवाहाचा धोकादायक मार्ग निवडतात, यामध्ये वाघांचा नाहक बळी जात आहे.
अपघातात १४ वाघांचा मृत्यू झाला आहे. वाघांचे सर्वाधिक ३२ मृत्यू हे २०२१ मध्ये झाले आहेत. व्याघ्र संवर्धनासाठी वनविभागाकडून अनेक प्रयत्न करण्यात येतात. मात्र हे प्रयत्न अपुरे ठरत असल्याचे दिसते, अशी माहिती कोल्हारकर यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nagpur News : तृतीयपंथी कलाकारांच्या नृत्याविष्काराची रसिकांवर मोहिनी