मुंबई : राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. तसेच मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू असून कल्याण, ठाणे आणि परिसरात पावसाच्या पाण्यामुळे तेथील नद्यांना पूर आला आहे. या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसलेला दिसून येत आहे.
बदलापूरजवळील उल्हास नदी धोक्याच्या पातळीजवळून वाहत आहे. तेथील रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. सध्या कर्जत ते कल्याण वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जत आणि बदलापूरचा संपर्क तुटला आहे. याच पार्श्वभुमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला. पुणे-मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील काही महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस, मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस आणि पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस आज गुरुवारी (दि. 25) जुलै रद्द करण्यात आल्या आहेत. तर, उद्या शुक्रवारी (दि.26 जुलै) सकाळी पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेसही रद्द करण्यात आल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई व मुंबई-पुणे येथील प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. बदलापूर शहराला उल्हास नदीच्या पुराचा धोका वाढला आहे. यामुळे बदलापूरमध्ये NDRF चे पथक दाखल झाले आहे.