पुणे : राज्य सरकारने नुकताच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. मात्र, यासाठी अर्ज करताना रांगेत उभे राहून महिलांना त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र, प्रचंड गर्दी झाल्याने अनेक महिलांना अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. याचाच फायदा घेत काही दलालांनी पैसे घेऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन देण्याचा धंदा सुरु केला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी आज शुक्रवारी (दि.05) सभागृहात महत्त्वाचे भाष्य केले.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी कोणालाही पैसे देऊ नका, असे आवाहन केले आहे. महिलांनो कुणालाही पैसे देऊ नका. कोण तुमच्याकडे पैसे मागत असेल तर सांगा. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे ऑगस्टमध्ये हातात आले तरी तुम्हाला 1 जुलैपासूनची रक्कम मिळेल. योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी रांगा लागत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची महत्त्वाची मुदतही वाढवून दिली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
लाडली बहीण योजनेसाठी महिलांना घरबसल्या अर्ज करता यावा, यासाठी सरकारने ‘नारीशक्ती दूत’ ॲप हे नवीन ॲप आणलं आहे. त्यामुळे आता घरबसल्या मोबाईलवरून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. हा अर्ज कसा करायचा? याची सोपी माहिती जाणून घेऊयात…
योजनेसाठी मोबाईलवरुन असा करा अर्ज
– सर्वात अगोदर नारीशक्ती दूत हे अॅप आपल्याला गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करावं लागेल. हे अॅप डाऊनलोड केल्यावर ते ओपन करा.
– अॅप सुरू केल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर ‘नारीशक्ती दूत ह्या APP मध्ये आपले स्वागत आहे.’ असा मेसेज दिसेल.
– यानंतर तीन स्लाइड पुढे जाऊन Done या बटणावर क्लिक करा. त्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर I Accept या बटणावर क्लिक करा. त्यानंतर लॉग इन या बटणावर क्लिक करा.
– लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या अॅपमध्ये तुमचं प्रोफाइल तयार करावं लागेल. ज्यामध्ये तुमचं पूर्ण नाव, इमेल-आयडी ही माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा. त्यानंतर तुमचं प्रोफाइल अपडेट करा. त्यानंतर योजना या पर्यायावर क्लिक करा.
– यानंतर माझी लाडकी बहीण या योजनेचं हमीपत्र डाऊनलोड करा. त्यानंतर मुख्य पेजवर या. जिथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे बटण दिसेल. त्यावर क्लिक करा.
– त्यानंतर इथे महिलेचे नाव टाकायचं त्यानंतर महिलेच्या वडील किंवा पतीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जन्मतारीख निवडायची आहे. जन्मतारीख निवडताना हे सुनिश्चित करा की अर्जदार महिलेचं वय हे 21 ते 65 या दरम्यान असायला हवं.
– त्यानंतर तुम्हाला पुढे जिल्हा, गाव/शहर हे निवडावं लागेल. तसंच तुमचं स्थानिक स्वराज्य संस्था जी असेल ती निवडावी. पुढे पिनकोड आणि तुमचा पत्ता ही माहिती भरा. तसंच यासोबत मोबाइल नंबरही टाकावा लागेल.
– पुढे तुम्हाला अशी माहिती विचारण्यात येईल की, तुम्हाला शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळतोय का याबाबत विचारणा करण्यात येईल. मिळत असेल तर हो यावर क्लिक करा. नसेल मिळत तर नाही यावर क्लिक करा.
– यानंतर तुमच्या बँकेशी संबंधित माहिती भरा. ज्यामध्ये बँकेमध्ये तुमचे जे पूर्ण नाव आहे ते भरा. तसंच तुमचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोडही भरा.
– यानंतर तुम्हाला काही कागदपत्रं अपलोड करावी लागतील. ज्यामध्ये तुम्हाला आधारकार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा त्याऐवजी पिवळे/केशरी रेशनकार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक हे कागदपत्र अपलोड करावी लागतील.
– तुम्हाला खाली अर्जदाराच्या फोटोचा ऑप्शन आला असेल. या ठिकाणी कोणताही फोटो अपलोड करायचा नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो काढून अपलोड करायचा आहे.
– त्यानंतर Accept हमीपत्र डिसक्लेमर या बॉक्समध्ये टीक करा. त्यानंतर माहिती सादर करा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा अर्ज सब्मिट करा.
– त्यानंतर तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा एकदा चेक करून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट फॉर्म या बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका.
– अशा पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. त्यानंतर तुमचा अर्ज भरून पूर्ण झाल्याचा मेसेज तुम्हाला येतो.