पुणे : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना आता 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. महिला आणि बालविकास विभागाने सोमवारी (2 सप्टेंबर) यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. त्यानुसार, लाडकी बहीण योजनेंतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात देखील नोंदणी सुरु ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.
सध्या अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी 31 ऑगस्टपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येत होता, आता सरकारने ही मुदत आणखी वाढवली असून 30 सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
या पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. तर ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्याचे पैसे त्यांना मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून यापुढेही नोंदणी सुरूच राहणार आहे. मात्र यापुढे ज्या महिन्यात नोंदणी होईल, त्याच महिन्यापासून लाभार्थी महिलांना लाभ मिळेल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
गडचिरोली येथील कार्यक्रमात बोलताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे पुढे म्हणाल्या, सध्या राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या योजनेसाठी राज्यातील एक कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. 1 सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरपासून पुढे पैसे मिळतील. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे पैसे मिळणार नसल्याचे सांगितले.