पुणे : महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस राज्यभरातून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील महिलांची सेतू कार्यालये आणि तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. दर महिन्याला 1500 रुपये राज्य शासन देणार आहे. या योजनेसाठी 1 कोटी हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान आता या योजनेसंदर्भात लाडक्या बहीणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 17 ऑगस्ट रोजीच या योजनेचे 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे, रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरीत केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील. 17 ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याचीही माहिती आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असून आता त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या योजनेचा पहिला हप्ता ररक्षाबंधनच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजेच 3 हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट 17 ऑगस्ट रोजी जमा होणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिला प्रयत्नशील आहेत. अशावेळी त्यांना फारसा त्रास होऊ नये यासाठी सरकार देखील या योजनेची अत्यंत वेगवान पद्धतीने अंमलबजावणी करत आहे.