अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडी तोडफोड प्रकरणानंतर मृत्यू झालेल्या मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचा मृत्यूला वेगळं वळण आलं आहे. जय मालोकार यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. परंतु हा मृत्यू हृदयविकाराने झालेला नसल्याचं पुढे आलेलं आहे. या घटनेदरम्यान जय मालोकर यांना मारहाण झाली होती. या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून पुढे आली आहे.
जय मालोकरच्या पाठीवर, छातीवर, डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तसेज मारहाण इतकी भयानक करण्यात आली होती की, जय मालोकर याच्या छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर होत्या. तसेच डोक्याला देखील गंभीर मारहाण झाली आहे. पोस्टमार्टमवेळी जयच्या मेंदूला सूज होती, त्यामुळे त्याच्या मेंदूचं वजन वाढलं. मानेवर जबर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूंना गंभीर इजा झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या घटनेमुळे न्युरोजेनिक शॉकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
अकोल्यातील शासकीय विश्रामगृहावर 30 जुलै रोजी आमदार अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडली होती. या राड्यानंतर मनसेच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्याच रात्री गुन्हा दाखल झालेल्यांपैकी जय मालोकर यांचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचं सांगितलं जातं होतं, परंतु बुधवारी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचं कारण उघडं झालं आहे.