हिंगोली : वसमत (जि.हिंगोली) तालुक्यातील अनेक गावांना आज रविवारी (ता.८) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. सुदैवाने भुकंपाच्या धक्क्याने जीवित अथवा वित्तीय हानी झाली नसली तरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
वसमत तालुक्यातील वसमत, कुरूंदा, गिरगाव, कवठा, बर्ताळ, डोणवाडा, सैलु, पार्डी, कोठारी, पांग्रा शिंदे, वापटी, कुपटी, शिरळी यासह जोढानागनाथ व कळमनुरी तालुक्यातील ही अनेक गावांना ८ जानेवारीच्या पहाटे ४.३१ मि दरम्यान भुगर्भातून मोठा आवाज येत जमिन हादरली.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही तालुक्यातील अनेक गावांना गत ६ ते ७ वर्षांपासून भुकंपाचे धक्के सतत जाणवत आहेत, यापूर्वी दोन वेळेस भुकंपाची नोंद देखील झाली आहे.
सतत भुकंपाचे धक्के जाणवत आसल्याने नागरिकांनाधून भिती व्यक्त केल्या जात आहेत. रविवार रोजी पहाटे जाणवलेल्या भुकंपाच्या धक्क्यात नुकसान झाले नसले तरी नागरिकांच्या मनात भीती कायम आहे.
याबाबत बोलताना तहसिलदार अरविंद बोळंगे म्हणाले की, भुकंपाची नोंद झाली का याची माहिती घेणे चालू आहे. भुकंपाच्या धक्क्याने हानी व नुकसान झाले नाही, महसुल पथके पाहाटेपासुन सर्वत्र फिरुन माहिती घेत आहेत.