परभणी : परभणीमधून मोठी बातमी समोर येत आहे. परभणीत दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुणाचा तुरुंगातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परभणी शहरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची गंभीर दखल घेत नांदेड परिक्षेत्राचे आयजी शाहजी उमाप पुन्हा परभणीत दाखल झाले आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी (वय-35) असे मृत तरुणाचे नाव आहे.
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा ताणलेल्या घटनांनंतर 50 जणांना ताब्यात घेण्यात आले. असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा कारागृहातच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. याबाबत सध्या काहीही स्पष्ट झालेलं नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, परभणी शहरात सध्या जमाबंदी आहे. मात्र, कोणतीही संचारबंदी नाही, परिस्थिती हाताळण्यासाठी संचार बंदीची आवश्यकता वाटत नाही, असेही नांदेड परिक्षेत्राचे आयजी शाहजी उमाप यांनी स्पष्ट केले.