परभणी: लग्नासाठी सातत्याने मागे लागलेल्या युवकास वारंवार नकार देवूनही न ऐकणाऱ्या युवकाने मुलीच्या घरी जावून मुलीला व तिच्या कुटुंबियांना बंदुकीच्या गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या संदर्भात शहरातील क्रांती चौक येथील रहिवासी आणि तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीने फिर्याद दिली आहे. तीन महिन्यांपूर्वी पीडित मुलगी शहरातील गंगाखेड रोडवरील एका मंगल कार्यालयात मैत्रीणीच्या लग्नासाठी गेली होती. यावेळी तिची ओळख शहरातील वसमत रोड परिसरातील दत्तधाम येथील रहिवासी असलेल्या रोहित मोरे याच्याशी झाली. त्यानंतर ते सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते. या दरम्यान रोहित मोरे यांनी पीडित मुलीला लग्न करण्याविषयी विचारले होते. त्यावेळी तिने रोहित मोरे याला नकार दिला. त्यानंतर सदर मुलगी ड्युटीवर जात असताना तिचा पाठलाग करून समक्ष भेटून परत लग्नाविषयी विचारले, तेव्हा देखील तिने स्पष्टपणे नकार दिला.
याचबरोबर आई-वडिलांच्या इच्छेनुसार लग्न करणार असल्याचे म्हणत तुझ्याशी लग्न करणार नाही, असे सांगितले. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी रोहित मोरे पीडित मुलीच्या घरी पोहोचला. यावेळी तिचे वडिल घरी होते. त्यांना तुमच्या मुलीस भेटायचे आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी त्यास घरात घेतले नाही. त्यानंतर रोहित मोरे याने आरडाओरड सुरू केली. घराच्या भिंतीवरून घरामध्ये उडी मारली. तुमच्या मुलीसोबत लग्न करणार आहे. तुम्ही लग्न करण्यासाठी तयार रहा, नाहीतर तुमच्या घरातील सर्वांना जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली. यावेळी देखील पीडितेने तिच्या आई-वडिल, भाऊ यांच्या समोर रोहित मोरे याला तुझ्याशी लग्न करणार नाही. आमच्या घराकडे येवू नको असे सांगितले.
यावेळी मोरे याने सर्वांसमोर तिचा हात धरून तुला माझ्या सोबतच लग्न करावेच लागेल, नाहीतर तुझ्याही जिवाचे व माझ्याही जिवाचे बरेवाईट करने, तुझे दुसरीकडे लग्न होवू देणार नाही. मी एका मिल्ट्रीमॅनचा मुलगा आहे. माझ्या घरात बंदुक आहे. बंदुकीचे लायन्स आहे. बंदुकीच्या गोळ्या आहेत. त्या बंदुकीच्या गोळ्या मी तुला व तुझ्या घराच्यांना घालीन, असे म्हणून धमकी दिली. हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून पीडितीने ती कार्यरत असलेल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यांनी रोहित मोरे याला विचारणा केली, त्यावेळी त्याने पुन्हा लग्नाचा मानस व्यक्त केला. यावेळी देखील पीडितीने लग्न करणार नाही, असे सांगितले. यावेळी रोहित मोरे याने तुम्हा सर्वांना बघून घेतो, अशी धमकी दिली.
या प्रकरणात कुटुंबियांची बदनामी होईल, या भितीने सुरुवातीला तिने कोणाला काही सांगितले नाही, परंतु मंगळवारी (दि.६) दुपारी पीडित मुलगी ड्युटीवर असताना आरोपीने तिच्या आई-वडिलांना मुलीचे लग्न माझ्याशी लावून दिले नाही, तर पूर्ण कुटुंबियांना बंदुकीच्या गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मात्र बुधवारी सायंकाळी या संदर्भात नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. या माहितीवरून आरोपी रोहित मोरे विरूध्द भारतीय न्याय संहिता ( बीएनएस) २०२३ चे कलम ३३३, ३५१ (२), ३५१ (३), ७४, ७८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.