जालना : पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी सेनगाव खु (जि. हिंगोली) येथून जालना येथे आलेल्या एका २० वर्षीय तरुणाचा मैदानावर धावतांना अचानक मृत्यू झाला. गुरुवारी (दि.२३) जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळी ही घटना घडली. आकाश सुरेश इटकर असे मयत तरुणाचे नाव आहे. तो हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव (खु) येथील रहिवासी होता.
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आकाशने जालना शहरातील नूतन वसाहत भागातील श्री करिअर अॅकॅडमीत ८ मे२०२४ रोजी प्रवेश घेतला होता. ही अॅकॅडमी तरुण-तरुणींना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देते. संदीप जाधव हे या श्री करिअर अॅकॅडमीचे संचालक आहेत.
पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुण-तरुणांनाकडून जालना शहरातील जिल्हा क्रीडा संकुलावर शारीरिक कवायती करून घेतल्या जातात. त्यात धावणे, गोळी फेक आदींचा समावेश आहे. गरुवारी सकाळी क्रीडा संकुलाच्या मैदानावर तरुण- तरुणी धावण्याचा सराव करत असताना आकाश अचानक खाली कोसळला. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यास मृत म्हणून घोषित केले. मृत आकाशचे वडील हे मुंबई येथे दगडांच्या खदानीवर दगड फोडीचे काम करतात. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय उपासणी झाल्यानंतर आकाशचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.