पाचोड (छत्रपती संभाजीनगर) : शेतातील विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेल्या तरुणाला विद्युत शॉक बसला परंतु, दवाखान्यात घेवून जाण्यासाठी तांड्यावरून रस्त्या चांगला नसल्याने वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. यात प्रमोद संपत चव्हाण यांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मोती तांडा (ता.पैठण) येथे गुरुवारी (दि.१) सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. तांड्यावरील रस्त्याच्या दुरावस्थेने एका तरुणाचा बळी घेतला असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मागील आठवड्यात खेर्डा ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या मोती तांडा (ता. पैठण) परिसरात सलग रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने तांड्यावर जाणारा रस्ता खराब झाला आहे. गुरुवारी सकाळी पावसाने उघडीप दिल्याने शेतातील पिकांवर कीटकनाशकाची फवारणीसाठी पाणी लागत होते. म्हणून प्रमोदने शेतातील विद्युत पंप सुरू होत नसल्याने तो बिघाड शोधत होता. दरम्यान, प्रमोद यास जोरात विद्युत शॉक बसून जमिनीवर कोसळला. यावेळी गावकऱ्यांनी त्यास दुचाकीवरून उपचारासाठी हलवले. परंतु, पावसामुळे रस्ता खराब झाला असल्याने दुचाकी चिखलात फसू लागल्या.
त्यामुळे गावातील काही तरुणांनी साडीची झोळी करून गावाबाहेर दोन ते अडीच किलोमीटर पायी उचलून आणले व त्यानंतर त्यास तातडीने खासगी वाहनाद्वारे पैठण येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारसाठी दाखल केले. मात्र, येथे कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. घटेनी माहिती पाचोड पोलीस ठाण्यात देण्यात आली असता बीट जमादार पवन चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.