जिंतूर (परभणी): शहरात श्री विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेच्या तालावर नाचत असताना डीजेचा कर्णकर्कश आवाज सहन न झाल्याने हृदयविकाराने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन तरुण अस्वस्थ झाल्याची घटना मंगळवारी (दि. १७) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शहरातील विसर्जन मिरवणुकीत घडली. तरुणाच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतरही मिरवणुकीत डीजेचा दणदणाट एक तास सुरूच होता. शहरातील फक्त चार मंडळांनी श्री विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. यापैकी मानाचा गणपती असलेल्या श्री चिंतामणी गणेश मंडळाने नेहमीप्रमाणे पारंपरिक वाद्य लावत मिरवणूक काढली, तर गणपती गल्लीमधील गजानन गणेश मंडळ, वरुड वेसमधील राजे शिवछत्रपती गणेश मंडळ, श्री नगरेश्वर गणेश मंडळ, बामणी प्लॉट गणेश मंडळ या चार गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्याला बगल देत कर्णकर्कश आवाजातील डीजे लावले. या डीजेच्या आवाजाने मिरवणूक मार्गावरील घरातील वस्तू हलत होत्या. एवढा भयंकर आवाज या डीजेचा होता.
मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकापुढे पोलीस ठाण्याजवळ आली असता, राजे शिवछत्रपती गणेश मंडळातील डीजेसमोर नाचणारे संदीप विश्वनाथ कदम (रा.बोर्डी) यांच्या छातीत दुखायला लागल्याने त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला, तर याच गणेश मंडळात डीजेसमोर नाचणारे शिवाजी कदम, शुभम कदम, गोविंद रामेश्वर कदम (सर्व रा. बोर्डी, ता. जिंतूर) यांनाही आवाजाने अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनाही ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार करून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्यात आले.