नांदेड : पत्नीला सोडचिठ्ठी देत १ कोटी रुपयांची मागणी करुन मानसिक, शारीरिक त्रास दिल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मगनपुरा भागातील रहिवासी चेतन चंद्रकांत पाटील या तरुणाने हर्षा आसवाणी या तरुणीसोबत विवाह केला होता. परंतु चेतनची पत्नी हर्षा, तिचे वडिल हरीश व आई रितू हरीश आसवानी (रा. पुरुषार्थ नगर नांदेड) यांनी २० ऑगस्ट २०२२ ते १० ऑगस्ट २०२४ दरम्यान हर्षाला सोडचिठ्ठी दे, तसेच १ कोटी रुपये दे म्हणून मागणी करीत त्याचा मानसिक व शारीरिक छळ करीत होते.
तसेच शिविगाळ करुन तुमच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करतो अशी धमकी सातत्याने देत होते. तुझ्या परिवारालाही सोडणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली. या त्रासाला कंटाळून चेतनने १४ डिसेंबर २३ रोजी अॅपल कंपनीच्या मोबाइलमधील नोटस् अॅपमध्ये मला मरण आले तर त्यास माझी पत्नी हर्षा, तिचे वडिल हरीश आसवानी हेच जबाबदार असतील असे लिहून ठेवले होते. त्यानंतर चेतनने रविवारी (दि.११) राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी हर्षा, हरीश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी लावून धरली. त्यानुसार मयत चेतनचे वडील चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी मृताची पत्नी हर्षा, तिचे वडिल हरीश, सासू रितू यांच्याविरुद्ध गुरनं ३२८/२४ कलम १०८, ३५२, ३५१-२, ३५१-३. ३५ भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत चेतनचे वडील चंद्रकांत हे नांदेडचे माजी नगराध्यक्ष आहेत.