सेनगाव (जि. हिंगोली): ‘माझ्या शेतीचा फेर तुझ्या नातेवाईकांनी का अडवला ? अशी विचारणा करून महिलेवर भरदिवसा चाकू हल्ला करून गंभीरित्या जखमी केल्याची घटना रविवारी (दि.११) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पार्वतीनगरमध्ये घडली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली.
शहरातील पार्वतीनगरमध्ये राहणाऱ्या उर्मिला ज्ञानेश्वर काळे (वय २५) आपल्या भाड्याच्या घरामध्ये बसल्या असता त्यावेळी त्यांच्या गावाकडील रहिवासी आरोपी नारायण सुभाष होडवे (रा. होलगिरा ता. सेनगाव जि. हिंगोली) हा तिथे आला. तुझा नवरा व सासरा कुठे आहे? असे विचारणा केली. पती दुकानावर आहेत व सासरे बाहेर गेले आहेत, असे सांगत असताना अचानक नारायण होडबे हा घरात शिरला. ‘माझ्या जमिनीचा फेर तुझ्या नातेवाईकांनी का आडविला ? असे म्हणत आरोपीने त्याच्या हातातील चाकूने वार केला.
नारायण होडबे याने सदर महिलेच्या पोटात, डाव्या हाताच्या कोपऱ्याजवळ व कमरेवर उजव्या बाजूस चाकूने वार करून गंभीर जखमी केले. मदतीसाठी आरडाओरड केल्याने शेजारील मंगेश बोरकर, मधुकर आदमने, नागेश घाटोळकर, ऋषिकेश देशमुख हे धावत उर्मिला यांनी सोडवणूक केली. तसेच उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर पती ज्ञानेश्वर काळे यांनी हिंगोली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सेनगाव शहरात सकाळच्या सुमारास भरदिवसा महिलेवर जीवघेणा चाकू हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, सेनगाव पोलीस निरीक्षक संतोष तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक घारगे, शहर बीट अंमलदार सुभाष चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीविरूध्द सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.