नळदुर्ग (जि. धाराशिव): ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी आलेल्या नवविवाहितेला सेल्फी काढण्याचा मोह जिवावर बेतला आहे. किल्ल्यातील उंच बुरूजावरून तोल जाऊन खाली पडल्याने या विवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२७) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील किल्ल्यावर घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नळदुर्गचा ऐतिहासिक व प्राचीन किल्ला पाहण्यासाठी दररोज पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. यामध्ये लग्न झालेल्या नवदाम्पत्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. २७ मे रोजी सकाळी तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (तुळ) येथील अमीर शेख हे आपली पत्नी निलोफर व दोन नातेवाईकांसह किल्ला पाहण्यासाठी नळदुर्गच्या किल्ल्यात आले होते. अमीर शेख व त्यांची पत्नी निलोफर शेख (वय २२ वर्षे) यांचा आठवडाभरापूर्वी म्हणजेच २० मे रोजी विवाह झालेला आहे. फिरायला जायचे म्हणून हे दाम्पत्य दोन नातलगांसह नळदुर्गचा किल्ला पाहण्यासाठी आले होते. किल्ल्यात गेल्यानंतर त्यांनी इतर स्थळांची पाहणी करून ११.३० वाजेच्या सुमारास सर्वजण किल्ल्यातील सर्वात उंच असणाऱ्या उपली बुरुजावर गेले.
या ठिकाणी उपली बुरुजावर गेल्यानंतर नवविवाहिता निलोफर यांना बुरुजावरून सेल्फी काढण्याचा मोह झाला. यावेळी वारा सुटलेला होता. सेल्फी काढण्यासाठी निलोफर शेख या बुरुजाच्या कडेला गेल्यानंतर त्यांचा तोल जावुन त्या बुरुजावरून खाली पडून गंभीर जखमी झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा पती अमीर शेख व इतर दोन नातेवाईकही बुरुजावरच होते. घटनेची माहिती मिळताच तत्काळ त्या ठिकाणी असणाऱ्या युनिटी मल्टीकॉन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व निलोफरच्या नातेवाईकांनी किल्ल्यात असणाऱ्या वाहनामधून गंभीर जखमी झालेल्या निलोफर यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वीच निलोफर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आठ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या व अजुन हातावरची मेहंदी जाण्यापूर्वीच नवविवाहिता निलोफरचा किल्ल्यातील बुरुजावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.