बीड : संतोष देशमुख खून प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी सुरेश धसांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले होते. त्यावर बोलताना ‘मिटकरींना राष्ट्रवादीतील बडी मुन्नी बोलायला लावते,’ असा आरोप धसांकडून करण्यात आला. धसांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? अशी चर्चा आता संपूर्ण राज्यात होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारही त्यावर चांगलेच संतापले होते. आता सुरेश धस यांनीच राष्ट्रवादीतील ती बडी मुन्नी कोण यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीतील ती बडी मुन्नी कोण?
आमदार सुरेश धस म्हणाले, जी मुन्नी आहे, तिला कळालं आहे. पण, ती महिला भगिनी नाही बरं का? नाहीतर आणखी काहीतरी आमच्यावर राळ उठायची. मुन्नी म्हटलंय मी, पण ती राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुरुष मुन्नी आहे. त्या पुरुष मुन्नीला चांगलं माहिती आहे की, सुरेश धस माझ्यावरच बोलत आहे. त्या मुन्नीला माझी विनंती होती, कच्चे बच्चे लोक माझ्याविरोधात बोलायला पाठवू नका.
मुन्नीने दुसऱ्याला न पाठवता स्वतःनेच माझ्याविरोधात बोलायला यावे आणि मुन्नी आल्याशिवाय बोलायला मजाही येणार नाही. समोरा समोर चर्चेला येण्याचे माझे मुन्नीला दीड हजार टक्के चॅलेंज आहे. मुन्नीनं कोणत्याही स्टुडिओमध्ये चर्चेला येऊन बसावं, माझं आव्हान आहे. तुम्ही मुन्नीला चर्चेला बोलवा. मुन्नीनं सांगावं सुरेश धस मला मुन्नी म्हणतोय म्हणून लगेच कार्यक्रम करून टाकू, उशिर नकोच, असेही सुरेश धस यांनी सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा संबंध आहे की नाही?, ते अजितदादांना लवकरच कळेल, असा गर्भित इशाराही सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला दिला आहे, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याविरोधात लढाई सुरेश धस मागे घ्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे.
अजितदादा मुन्नीबाबत काय बोलले होते?
सुरेश धस हे राष्ट्रवादीतील बडी मुन्नी असा उल्लेख वारंवार करत आहेत. त्याबाबत अजित पवार म्हणाले की, बडी मुन्नी कोण ते त्यांना विचारा. असल्या फालतू गोष्टींवर मी बोलणार नाही. मी नाव घेऊन बोलणारा व्यक्ती आहे. त्यामुळे ही बडी मुन्नी कोण आहे, ते तुम्ही त्यांनाच विचारा. सुरेश धस यांच्याबाबत मी बावनकुळे आणि मुख्यमंत्र्यांना जे सांगायचे ते सांगितले आहे. काय ते योग्य निर्णय घेतील, असंही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.