छत्रपती संभाजीनगर: दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे गतवर्षी जिल्ह्यातील तलाव, जलस्त्रोत भरले होते. त्यामुळे गेल्यावर्षीचा उन्हाळा सुसह्य झाला. तथापि, गतवर्षीच्या पावसाळ्यात पाऊसच झाला नसल्याने तलाव, जलस्त्रोत कोरडे झाले आहे. गतवर्षीच्या हिवाळ्यापासूनच जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली. आता यावर्षी २०२४ चा उन्हाळा टंचाईच्या दृष्टीने तापदायक जात असून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा तसेच यातील पाण्याची विक्री होवू नये म्हणून प्रशासनाने टंचाई काळात पाणीविक्रीवर प्रतिबंध घालावा, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
गेल्या दोन-तीन वर्षापासून जिल्ह्यात टंचाईपासून लोकांना मुक्ती मिळाल्याने टँकरची गरज भासली नव्हती, यावर्षी मात्र काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. तथापि, दरवर्षी निरीक्षण विहीरींची तपासणी करून भुजल पातळी तपासली जाते. यावर्षी आतापर्यंत तरी भुजल पातळी खालावली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पाऊस नसल्याने प्रशासनाला टंचाईग्रस्त गावांमध्ये लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.