पैठण : जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीने ८० टक्क्यांचा पल्ला पार केला आहे. येत्या दोन चार दिवसांतच तुडुंब भरण्याच्या मार्गावर असलेल्या जायकवाडी धरणातून शुक्रवारी (दि.३०) दुपारी उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. कालव्यातून २०० क्युसेक्स या वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती धरण अभियंता विजय काकडे यांनी दिली.
यात टप्याटप्प्याने वाढ केली जाणार असून कालवा परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. जायकवाडीत वरील धरणांतून ५१ हजार ७२६ क्युसेक्सची आवक सुरु आहे. धरणात मोठया प्रमाणात पाणी दाखल होत असल्याने जायकवाडी प्रशासनाने शुक्रवारी दुपारी उजव्या कालव्यातून विसर्ग सुरू केला आहे. या पाण्यातून माजलगाव धरण भरले जाणार आहे.