लातूर : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात तळेगाव हे एक छोटंसं 150 उंबऱ्याचे गाव आहे. या गावातील सर्व नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. मात्र, या गावातील 75 टक्के म्हणजेच तब्बल 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डने दावा सांगितला आहे. या गावातील 103 शेतकऱ्यांचा 300 एकर जमिनीचा यात समावेश असून बोर्डाने यासंबंधी शेतकऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत. यामुळं आता तळेगावमध्ये भीतीचं वातावरण परसलं आहे.
तळेगाव हे जवळपास 150 उंबऱ्यांचे गाव आहे. येथील सर्वांचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो. पण आता गावातील 103 शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवर महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबादच्या न्यायालयाने वक्फ याचिका क्रमांक 17/ 2024 अन्वये हा दावा केला आहे. तसेच संबंधित शेतकऱ्यांना याद्वारे बजावण्यात आलेल्या नोटिसींमध्ये वक्फ न्यायाधिकरणात वैयक्तिकरीत्या तळेगावातील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या नोटिसा आल्या आहेत.
या सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन नोटिसला उत्तर देण्याचं ठरवलं आहे. वकिलांमार्फत उत्तरही दिलं आहे. आमच्याकडे अगोदरच एक-दीड एकर जमीन आहे. ती ही वक्फ बोर्डाने घेतली तर आम्ही करायचे काय? असा युक्तिवाद त्यांनी या प्रकरणी केला आहे. मागील तीन ते चार पिढ्यापासून आमच्या ताब्यात असलेली ही जमीन आता परत जाईल या भीतीने गावातील अनेक शेतकरी दहशतीत आहेत.
आमचा उदरनिर्वाह शेती व शेतमजुरीवरच अवलंबून आहे. त्यामुळे ही जमीन आमच्या हातची गेली तर आम्ही जगावे तरी कसे? आता शासनानेच योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा, अशी गावातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. शंभर दीडशे वर्षानंतर आपल्या जमिनी या वक्फ बोर्डाच्या आहेत, असा दावा जर कोणी करत असेल तर तो धक्काच आहे. या धक्क्यातून सावरत कायदेशीर लढाईसाठी गाव सज्ज झाले. मात्र मनात भीती आहे.
20 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी
गावातील शेतकऱ्यांनी यासंबंधी आपल्याकडील संपूर्ण दस्तावेज दाखवले आहेत. त्यांच्याकडे निजामकालीन दस्तावेजही आहेत. परंतु वक्फ बोर्डाच्या या नोटीसीमुळे गावकरी पुरते घाबरून गेले आहेत. त्यांनी या नोटीसींना एका वकिलामार्फत संयुक्तपणे उत्तर दिले आहे. त्यावर येत्या 20 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.