सध्या राज्याच्या शिक्षण गुणवत्तेचा आकडा खालावल्याचे निदर्शनास आले आहे. असरच्या अहवालानुसार ग्रामीण भागाचा आकडा खालावल्याचे पुन्हा आदोरेखीत झाले आहे. त्यातच विद्यार्थ्यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हातावर तुरी देणे याचा अर्थ काय हा प्रश्न शिक्षिका मुलांना विचारते. काही जण याची बरोबर उत्तर देतात. मात्र, जेव्हा त्यांना संदर्भ विटारला जातो तेव्हा विद्यार्थ्यांनी भन्नाट उत्तर दिली आहेत.
नक्की काय घडलं?
हातावर तुरी देणे याचा अर्थ काय हा प्रश्न शिक्षिका मुलांना विचारते. काही जण याची बरोबर उत्तर देतात. मात्र, जेव्हा त्यांना संदर्भ विचारला तेव्हा मात्र त्यांना त्याचे उत्तर देता आले नाही. तेव्हा मुले त्यांची कल्पनाशक्ती वापरुन उत्तरे तयार करतात.सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली आहे. तर, काहींनी या शिक्षेकेवरच टीका केली आहे.
व्हायरल व्हिडिओत काय?
व्हिडिओत एक विद्यार्थी म्हणतो की, आदिलशाहाने अफजलखानाच्या हातावर तुरी दिल्या. तर, एक म्हणतो की महाराष्ट्रात तुरी जास्त झाल्याने शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या. एका विद्यार्थ्यांने म्हटलं आहे की, औरंगजेबाला चांगलं वरण आवडत होतं म्हणून त्याला तुरी दिल्या. एक विद्यार्थी तर म्हणताना दिसतोय की, औरंगजेबाने शिवाजी महाराजांना संदेश पाठवला होता, मला तुरी पाहिजेत, म्हणून त्याला तुरा दिल्या.
प्रथमदर्शनी, शिक्षिकेनेच हा व्हिडिओ चित्रीत केला आहे. पण तो कोणत्या हेतूने काढला हे मात्र समोर आलेले नाहीये. सोशल मीडियावर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. काहींनी शिक्षकांच्या शिक्षणपद्धतीवर टीका केली आहे. तर, काहींनी म्हटलं आहे की मुलं निरागस आहेत. या वयात अशी उत्तरं अपेक्षित असतात. एकाने कमेंट केली आहे की, विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या हातावर तुरी दिल्या. व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असला तरी तो कोणत्या शाळेतला आहे व शिक्षिका कोण आहे, हे मात्र कळू शकलेले नाहीये.