बीड: जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संशयाची सुई वाल्मिक कराड याच्याकडे आहे. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात याला अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराडची आज पोलीस कोठडी संपत असून आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. राजकीय हेतूने माझ्या मुलावर आरोप केले जात आहेत असे म्हणंत परळीत पोलीस स्टेशनबाहेर वाल्मिक कराडच्या आईने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
माझ्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, वाल्मिक कराडच्या आईसोबत काही महिलांनी पोलीस स्टेशच्या गेटवर ठिय्या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. पोलीस स्टेशनच्या गेटवरच आंदोलन सुरू केल्याने परिसरातील वातावरण गंभीर झाले आहे. माझ्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा आरोप वाल्मिक कराडच्या आईने केला आहे. या प्रकरणात केवळ राजकारण सुरू असून माझा मुलगा निर्दोष असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तत्काळ माझ्या मुलावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, त्याला राजकीय हेतूने फसवण्यात आले आहे असे कराडच्या आईने म्हटले आहे.
वाल्मीक कराडला आज कोर्टात हजर केलं जाणार
या खंडणी प्रकरणात मागच्या तेरा दिवसांपासून वाल्मीक कराड पोलिस कोठडीत आहे. त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. सीआयडीकडून कोर्टात काय पुरावे सादर केले जाणार यावर त्याचा पुढील काळ कोठडीत जाणार की नाही हे ठरणार आहे. 29 नोव्हेंबरला मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सीआयडीचे अधिकारी करत आहेत. या गुन्ह्यात वाल्मीक कराडला 14 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पुढील सुनावणीसाठी त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.