बीड : जिल्ह्यातील परळी तसेच बीडमध्ये वाल्मीक कराडची चांगलीच दहशत होती. गुन्हेगारीतुन कमावलेल्या पैशातून वाल्मिक कराडने राज्यातील वेगवगेळ्या शहरांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होत आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत वाल्मिक कराडने 25 कोटी रुपये खर्च करून सहा कार्यालय स्पेसेस विकत घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास ईडीद्वारे होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर काम सुरु असलेल्या एका इमारतीत वाल्मिक कराड, त्याच्याशी संबंधित एक महिला आणि विष्णू चाटेच्या नावाने सहा ऑफिस स्पेसेस बुक करण्यात आल्याचे समोर आले आहे. वाल्मिक कराडने यासाठी पंचवीस कोटी रुपये मोजून बिल्डरसोबत करार केल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीचं काम पूर्ण झाल्यानंतर दोघांमध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होणार होता. मात्र त्याआधीच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यावर आरोप झाले आणि त्यातून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची पाळेमुळे खणून काढली जात आहेत.
ईडी अॅक्शन घेणार?
जिल्ह्यातील, वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या वर्चस्वाला जसा दहशतीचा आधार आहे. दहशतीतून पैसा निर्माण केला आणि या पैश्यातून अनेक उद्योग आणि इतर धंदे सुरू केले. परत त्यातून मिळणाऱ्या पैशांचं पाठबळ यांच्या दहशतीला आहे. म्हणून दहशतीचं हे वर्चस्व मोडून काढायचं असेल तर या अशा आर्थिक स्रोतांवर देखील कारवाई व्हायला हवी. त्यातूनच ईडी आता अॅक्शन मोड मध्ये येईल अशी चर्चा सुरु झाली आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंकडे वाल्मिक करायचा घरकाम
राज्यातले भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंकडे वाल्मिक कराड घरकाम करायचा. नंतरच्या काळात काका पुतण्यात मतभेद झाल्यानंतर तो धनंजय मुंडेंचा अतिशय विश्वासू बनला. सत्तेच्या जवळीकीचा फायदा घेत वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याचे समोर आले आहे. हा पैसा त्यांनी पुण्यात आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये उद्योग आणि व्यवसायांमध्ये पैसे गुंतवल्याचा आरोप होत आहे.
अवैध आर्थिक स्तोत्रांवर कारवाई होण्याची गरज
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेल्या आठ जणांवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई केली गेली आहे. मात्र वाल्मिक कराडला मकोकाच्या कारवाईतून वगळण्यात आलं आहे. वाल्मिक कराड आणि टोळीची दहशत संपवायची असेल तर त्यांच्या सर्व अवैध आर्थिक स्तोत्रांवर कारवाई होण्याची गरज आहे. त्यातूनच ईडीकड़े या टोळीच्या मालमत्तांचा तपास सोपवला जाण्याची शक्यता आहे.