बीड : वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केज सत्र न्यायालयातील सुनावणीवेळी वाल्मिक कराड याच्या दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कराडची कोठडी संपत असताना त्याला काल (14 जानेवारी) पुन्हा बीड येथील केज न्यायालयात हजर करण्यात आलं.
यावेळी पोलिसांच्यावतीने युक्तीवाद करण्यात आला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अजूनही एक आरोपी फरार आहे. या प्रकरणात आणखी बऱ्याच गोष्टींचा खुलासा व्हायचा आहे. वाल्मिक कराडची राज्याबाहेर कुठे संपत्ती आहे, त्याचाही तपास बाकी आहे. पोलीस संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडच्याभोवतीचा फास आवळत आहेत. त्यामुळे वाल्मिक कराडची सुटका होणे आता अवघड झाले आहे.
सहा फोन कॉल्स वाल्मिक कराडसोबत
दरम्यान, वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर संतोष देशमुख प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. आज पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार असून यामध्ये पोलीस वाल्मिक कराडची पोलीस कोठडी मागतील. पोलिसांच्या सूत्रांनूसार, विष्णू चाटे आणि खून प्रकरणातील आरोपी यांच्यादरम्यानचे सहा कॉल झाल्याचं सांगण्यात येत आहे.
खंडणी प्रकरण आणि खूनाच्या प्रकरणादरम्यान सहा फोन कॉल्स झालेले आहेत आणि हे सहा फोन कॉल्स वाल्मिक कराडसोबत झाले आहेत. याबाबत आज पोलीस न्यायालयात माहिती देऊ शकतात. खंडणी प्रकरण त्यानंतर विष्णू चाटे यांना झालेली मारहाण आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची झालेली हत्या या सगळ्याचे धागेदोरे वाल्मिक कराडसोबत जोडले जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.