बीड: जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज एक महिना उलटला आहे.या हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड काहीदिवसापूर्वी पुण्याच्या सी आय डी कार्यालयात शरण आला. हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. या घटनेचा तपास सी आय डी आणि एस आय टी कडून सुरू आहे. तपासात स्थानिक गुन्हे शाखा देखील सहभागी आहे. गुन्हे शाखेकडून आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. जयराम माणिक चाटे, महेश सखाराम केदार, प्रतिक घुले, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनावणे हे आरोपी अटकेत आहेत.
वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग
दरम्यान वाल्मिक कराडच्या प्रकृतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आली आहे. नऊ दिवसांपासून वाल्मीक कराड बीडच्या सीआयडी कोठडीत आहे. वाल्मिक कराड आजारी पडला आहे. वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्याला डोळ्यात टाकण्यासाठी आय ड्रॉप दिले आहेत. सी आय डी कडून आज त्याचा व्हॉईस सॅम्पल घेण्याची शक्यता आहे. व्हाईस सॅम्पल जुळल्यानंतर वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होईल.
बीडमध्ये हत्या प्रकरणावरून रिपाई आक्रमक
मस्साजोगचे सरपंचं संतोष देशमुखच्या हत्येला आज तीस दिवस पूर्ण झाले आहेत. हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी रिपाई आठवले गटाकडून कंकालेश्वर मंदिरात साकडे घातले आहे. चार दिवसात हत्येचे स्पष्टीकरण द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. बीडमध्ये हत्या प्रकरणावरून रिपाई आक्रमक झाली आहे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ अशा अनेक ग्रामीण भागातील ग्रामपंचायती आज बंद ठेवण्यात आल्या आहेत.
आज राज्यभर ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे कामकाज बंद व ग्रामपंचायतीला कुलूप दिसत आहे. सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्यांनी बंदची हाक राज्यभरात अनेक ठिकाणी दिली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभर ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन केले जात आहे.