परतूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंजिनला भ्रष्टाचाराची चाके असून ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मोदी यांनी अजित पवारांवर केला आणि आज त्यांच्याच प्रचाराला भाजपची यंत्रणा जुंपल्याची खरमरीत टीका शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते उद्धव ठाकरे यांनी परतूर येथील जाहीर सभेत बोलताना केली. शिवसेनेला नकली म्हणणारे बेअकली असल्याचा आरोप करून ठाकरे यांनी मोदी, शाह यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ परतूर येथे आयोजित जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे शिवसेनेवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात मशाल धगधगत असून राज्यातील खोके सरकार केव्हा जळून भस्म होतेय, याची वाट पाहतोय. भाजपने शिवसेना फोडल्यानंतर आम्ही न्यायालयात गेलो. परंतु दुर्दैव असे की, आम्हाला न्याय तर सोडा, तारीख पे तारीख मात्र मिळत आहे. आमच्यावर फेक नरेटिव्हचा आरोप केला जातोय.
संविधान बदलण्याची भाषा आम्ही करीत असल्याचा कांगावा भाजपकडून केला जातोय. वास्तविक पाहता संविधानाप्रमाणे आम्हाला न्याय मिळतो का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. आमचे नाव चोरले, फोटो चोरले एवढेच काय आमच्या बापाचा फोटोही चोरला, महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे फोटो दिसतील, कारण मोदी, अमित शाहांचा फोटो म्हणजे पराभवाची गॅरंटी असल्याचा टोला त्यांनी लगावला. आमच्या हिंदुत्वावर देखील वारंवार टीका केली जाते.
आमचे हिंदुत्व घरे पेटवणारे नसून चूल पेटवणारे असल्याचे स्पष्ट करून ठाकरे यांनी भाजपचे हिंदुत्व दंगली घडवणारे, जातीजातीत भांडणे लावणारे, तर आमचे हिंदुत्व ‘हृदयात राम आणि हाताला काम’ हे आहे. त्यामुळे कुणी आमच्या हिंदुत्वाविषयी शंका घेऊच नये, असे त्यांनी बजावले. मुंबई उद्योगपतींच्या घशात घातली जात असल्याचा आरोप करून ठाकरे यांनी मुंबई काय खिरापत वाटली काय? असा सवाल उपस्थित करीत मुंबई मराठी माणसांची आहे. ती आम्ही परत घेणारच असल्याचा निर्धार केला. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.