जालना : रस्त्याच्या कामावरील दोन कामगारांचे अपहरण करणाऱ्या एका संशयिताविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.२७) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अपहरण झालेल्या कामगारांची तालुका पोलिसांनी अवघ्या दोन तासात सुटका करून संशयित आरोपीस अटक केली आहे. पैशांच्या कारणावरून हे अपहरण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या विषयी माहिती देताना तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी सांगितले की, खरपुडी शिवारात रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावर मशीन ऑपरेटर म्हणून काम करणारे संजय गाडेकर व पंडित राठोड यांचे संशयित कैलास देठे (रा.खरपुडी) याने सायंकाळी पाच वाजता अपहरण केले.
दरम्यान, या प्रकरणी सुरेश रामेश्वर कदम (रा.रेवगाव) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेश उणवने, सहायक निरीक्षक अतुल पाटील, उपनिरीक्षक नागरगोजे, काँस्टेबल विलास आटोळे, अमंलदार लक्ष्मण शिंदे, चंद्रकांत माळी यांनी शोध सुरू केला. दरम्यान, संशयित कैलास देठे हा राममूर्ती शिवारात कामगारांसह मिळवून आला. पोलिसांनी कामगारांची सुटका करत संशयित देठे यास ताब्यात घेऊन तालुका ठाण्यात आणले.