परभणी : शेतातील डीपी बंद असल्याच्या संदर्भातील अहवाल शेतकऱ्याला देण्यासाठी महावितरणच्या मानवत कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्याने २० हजारांची लाच मागून १५ हजार रूपये कनिष्ठ तंत्रज्ञाच्या सहाय्याने घेतल्याची घटना समोर आली. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे.
तक्रारदार शेतकऱ्याच्या शेतातील बोअरवर विद्युत मोटार बसविले आहे. त्यास विद्युत पुरवठा करणारे डीपी पावसाळ्यापासून बंद असल्याने १९ नोव्हेंबर रोजी त्यांनी मानवत महावितरण कार्यालयातील कनिष्ठ अभियंता मोहम्मद तलहा मोहम्मद हिमायत यांची भेट घेतली. त्यांचे बोअर विद्युत मोटारकरिता विद्युत पुरवठा करणारा डीपी बंद असल्याचा अहवाल देण्याची मागणी केली. त्यावरून मोहम्मद तलहा मो. हिमायत यांनी तक्रारदाराकडे २० हजार रूपये लागतील असे सांगितले.
सदर रक्कम ही लाच असून ती तक्रारदार यांना देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या संदर्भात मंगळवारी (दि.२६) लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या परभणी विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी कारवाई दरम्यान मोहंमद तलहा यांनी तक्रारदार यांना डीपी बंद पडल्यांचे रिपोर्ट देण्यासाठी २० हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रूपये लाचेची मागणी केली. सदर लाच रक्कम ही मोहंमद तलहा यांनी कंत्राटी तंत्रज्ञ महेश कोल्हेकर यांच्याकडे देण्यास सांगितले.
सापळा कारवाई दरम्यान महेश कोल्हेकर यांनी तक्रारदाराकडून १५ हजार रूपये लाचेची रक्कम स्वीकारली. यावेळी त्याला लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपी मोहम्मद तलहा मोहम्मद हिमायत, महेश शिवरुद्र कोल्हेकर या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर, पोलीस निरीक्षक अल्ताफ अयुब मुलाली यांच्यासह परभणी विभागाच्या पथकाने केली.